Sunday, May 3, 2009

नाथ भागवतातील निवडक ओव्या - १

महाराष्ट्राच्या संत परंपरेत पूज्य एकनाथ महाराजांचे नांव अग्रभागी आहे. प्रपंचात राहून सुद्धा, गिरीकंदरात तपाचरण करणा-या योग्यांपेक्षा मोठी योग्यता असणारे नाथ प्रपंचात राहून पारमार्थिक साधन करू इच्छिणा-यांसाठी दीपस्तंभा सारखे आहेत. नाथांनी भरपूर लिखाण केले. "एकनाथी भागवत" त्यापैकी एक... नाथभागवतात सुंदर ओव्या आहेत. त्यातील कांही निवडक ओव्या येथे देत आहे ।

नाथभागवतात मुक्त पुरुषाचे वर्णन करताना नाथांची ओवी अधिक बहारदार होते. उपाधीशून्य असणारा भागवतोत्तम नाथांच्या लेखणीने सजीव होतो. ज्या ज्या सद्भाग्यवंतांना सद्गुरुंचा सहवास लाभला आहे त्यांना हे वाचताना आपल्या सद्गुरुंची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.

*********************
देही असोनि देहबुद्धी नाही । हे मुक्ताचे मुख्य लक्षण पाही ।
यालागी देही असुनि विदेही । म्हणिपे या हेतु ॥

- नाथभागवतात वर्णन असलेला मुक्त पुरुष हा कर्म करून सुद्धा कर्मबंधनातून मुक्त आहे. त्याचा विहार आत्मबुद्धीच्या सहज अविर्भावाने युक्त असतो म्हणून तो सामान्य लोकांसारखा लोकव्यवहार पाळत जरी असला तरी व्यवहारातील आसक्तीपासून मुक्त असतो. त्याचा देह चारचौघांसारखा व्यवहारात वावरणारा जरी दिसला तरी तो देहबुद्धी पासून मुक्त असतो.
*********************

तो इंद्रियाचेनि खेळेमेळे । सुखे विषयामाजि लोळे ।
तरि विकाराचेनि विटाळे । कदाकाळे विटाळेना ॥

- कर्मेंद्रियांचा व्यवहार म्हणजेच प्रपंच करत असताना हे सर्व भगवद्रुप आहे ही भुमिका अखंड जागी असल्यामुळे तो विषय भोगत असताना सुद्धा "विषय तो त्यांचा झाला नारायण " या भुमिकेवर दॄढ असतो.
*********************

ज्यासी निजस्वरुपी नाहता । जाहली परम पवित्रता ।
तीर्थे मागती चरणतीर्था । ऐसी सुस्नातता मुक्ताची ॥

- गुरुंनी शिष्याला केलेला बोध म्हणजेच अनुग्रह हा त्याच्या स्वरुपानुसंधानाची दिलेली चावी आहे. एकांताच्या तिजोरीत हे स्वरुपसुखाचे धन तो कायम लुटत असतो. हे स्वरुपानुसंधान गुरुंच्या संकल्पाने शिष्यात संक्रमित झालेल्या योगशक्तीचे तीर्थच आहे. साधक जेव्हा सिद्ध होतो म्हणजे गुरुतत्वात विलीन होतो तेव्हा त्या स्वरुपसुखाच्या सरोवरात त्याचे अखंड स्नान होत असते. आत्मस्वरुपाचे अनुसंधान करणारा योगी ही भारतीय विचारधारेने मांडलेली पावित्र्याची परिसीमा आहे. तीर्थक्षेत्रांचे पाणीदेखील या सत्पुरुषांच्या चरणस्पर्षाने पावन होते. ही कल्पना नसून योगशास्त्राचे प्रयोगसिद्ध तत्व आहे. याच अर्थाच्या ओळी "शिवदीन केसरी " यांच्या अभंगात येतात. "गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी.. "

अवचटे ये त्याच्या मुखाबाहेरी । ज्यासी म्हणे तुज देवो तारी ।
त्यासी मी वावूनिया शिरी । ब्रम्हसाक्षात्कारी पाववी ॥

- असा महात्मा सहजपणे जरी एखाद्याला "तुला देव तारील असे म्हणाला " तरी त्याचा शब्द देव शिरावर वाहून घेतो आणि त्याला साक्षात्कारापर्यंत नेतो.
*************************************

सकळ देहशास्त्रसंपन्न । त्यासीही मुक्त न कळे जाण ।
देही असोनि ज्यासी देहाभिमान । त्यासी मुक्तलक्षण कळेना ॥

- चांगदेवांसारखा योगाभ्यासी सुद्धा संत ज्ञानेश्वरांचा अधिकार ओळखू शकला नाही. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती त्यांच्या गॄहस्थजीवनाची सुरुवात होण्याआधी नाशिकला अक्कलकोटस्वामींचे शिष्य "देवमामलेदार " यांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा त्यांनी स्वामींचा हात हातात घेऊन तुम्ही मोठे सत्पुरुष होणार आणि कार्य करणार असे म्हटले. मुक्तलक्षण कळण्यासाठी देहबुद्धी वळून आत्मबुद्धी होणे आवश्यक आहे. देहाभिमान हा स्थूल देहाचा म्हणजे रुपाचा आणि त्या शरीराने केलेल्या कर्तॄत्वाचा असू शकतो. साधन उत्तम चालत असताना त्यायोगे सुक्ष्मदेहात काही अनूभूती येतात. पण त्यामुळे अभिनिवेष तयार होतो. हा सुक्ष्मदेहाचा देहाभिमान आहे. याचा परिणाम म्हणून उपासकांमध्ये सुद्धा उपासनेच्या अनुभवांना अनुलक्षून मतभेद होत रहातात. स्थूल आणि सुक्ष्म या दोन्ही देहांचा अभिमान जोवर आहे तोवर मुक्त पुरुष दिसूनदेखील त्यावर विश्वास बसत नाही.

*************************************