Monday, November 9, 2009

पुनर्जन्माचे भय


स्वामी विवेकानंदांच्या शिष्यमालिकेत स्वामी रंगनाथानंदांचे कार्य लक्षवेधी आहे.
त्यांच्या व्याख्यानाच्या मराठी अनुवादाचा हा एक अंश.
रामकॄष्ण मठातर्फे हा प्रकाशित झाला आहे.

भारतात मुक्तीशी दोन कल्पना पुष्कळदा जोडलेल्या दिसतात.
एक म्हणजे जगताविषयी वितॄष्णा किंवा घॄणा आणि पुनर्जन्माचे भय.
सर्वच मुक्तीवादी पंथांमध्ये हे दोन विचार स्पष्टपणे दिसतात.

दुसरा थोड्‌या वेगळ्या स्वरुपात दिसतो. मनुष्याच्या अध्यात्मिक शिक्षणात या दोन कल्पनांना महत्व आहे. फक्त पुष्कळश्या धर्मपंथांनी त्यांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिले आहे. त्यामुळे त्यांनी धर्मजीवन हे आनंदरहित व उदास बनवले आहे. ईश्वरसानिध्याचा आनंद दुःख आणि दमन यांनी झाकोळून गेलेला आहे. ईश्वरदर्शनाची प्रकाशमय उत्तुंगता बोटावर मोजण्याइतक्या थोर योग्यांनी अनुभवण्याची गोष्ट होवून राहिली आहे.

राबिया ही महान मुसलमान संत होती.
तिला कोणीतरी विचारले, "तुम्ही प्रभूवर प्रेम करता का?"
"होय, करते." ती उत्तरली.
"मग तुम्ही सैतानाचा द्वेष करत नाही काय?" दुसरा प्रश्न आला.
"माझे प्रभूवर इतके प्रेम आहे की सैतानाचा द्वेष करण्यासाठी वेळच मिळत नाही." राबियाने नेमके उत्तर दिले.

"देवा उदासवाण्या संतांपासून आम्हाला वाचव" असे सेंट तेरेसानी म्हटले आहे.

गुरु नानकदेव आणि कितीतरी भारतीय संत अतिशय उत्कट वॄत्तीचे, विनोदी बुद्धीचे, खेळकर आणि हसरे होते.

परंतु जगताविषयी घॄणा आणि पुनर्जन्माविषयीचे भय यांचा मोठा पगडा भारतावर होता हे खरे.
उत्तरकालातील भारतीय वाङ्‍मयात तो जोरकसपणे दिसतो.
धर्माकडे लोक पहातात ते जन्ममॄत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याचे साधन म्हणून.

जीवनाविषयीचे भय, मुक्तीविषयीची आस, पुनर्जन्म न यावा अशी तीव्र इच्छा- यांनी एवढे प्रश्न आणि प्रस्थ माजवले की हे पृथ्वीवरील अल्पकालीन मानवी जीवन , त्यातील प्रश्न, त्याचे भविष्य यांच्या छायेमध्येच त्यांनी आपल्याला झोकून टाकले. त्यातून एक नकारात्मक वॄत्ती उगम पावली.

ती एका जर्मन कवीच्या काव्यपंक्तीत उतरलेली दिसते.
"निद्रा मधूर आहे.
मॄत्यू मधूरतर आहे,
पण मधूरतम गोष्ट म्हणजे जन्मालाच न येणे!"

गेल्या हजार वर्षात या वॄत्तीने भारतीय मनाला पछाडले आहे.
त्यातून अत्यंत व्यक्तीवाद आणि सामाजिक जाणिव यांचा अभाव निर्माण झाला.

त्यामुळॆ मनुष्याचा अध्यात्मिक विकास तर थांबलाच पण ऐहिक विकासालाही खिळ पडली.

परकीय आक्रमणांचि मालिकाच सुरू झाली.
अवाजवी भय हे चारित्र्य जडणघडणीला हानिकारक असते.
त्यामुळे व्यक्तित्व विकासला मर्यादा पडतात; निर्दयता आणि दंभही वाढतात.

Sunday, May 3, 2009

नाथ भागवतातील निवडक ओव्या - १

महाराष्ट्राच्या संत परंपरेत पूज्य एकनाथ महाराजांचे नांव अग्रभागी आहे. प्रपंचात राहून सुद्धा, गिरीकंदरात तपाचरण करणा-या योग्यांपेक्षा मोठी योग्यता असणारे नाथ प्रपंचात राहून पारमार्थिक साधन करू इच्छिणा-यांसाठी दीपस्तंभा सारखे आहेत. नाथांनी भरपूर लिखाण केले. "एकनाथी भागवत" त्यापैकी एक... नाथभागवतात सुंदर ओव्या आहेत. त्यातील कांही निवडक ओव्या येथे देत आहे ।

नाथभागवतात मुक्त पुरुषाचे वर्णन करताना नाथांची ओवी अधिक बहारदार होते. उपाधीशून्य असणारा भागवतोत्तम नाथांच्या लेखणीने सजीव होतो. ज्या ज्या सद्भाग्यवंतांना सद्गुरुंचा सहवास लाभला आहे त्यांना हे वाचताना आपल्या सद्गुरुंची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.

*********************
देही असोनि देहबुद्धी नाही । हे मुक्ताचे मुख्य लक्षण पाही ।
यालागी देही असुनि विदेही । म्हणिपे या हेतु ॥

- नाथभागवतात वर्णन असलेला मुक्त पुरुष हा कर्म करून सुद्धा कर्मबंधनातून मुक्त आहे. त्याचा विहार आत्मबुद्धीच्या सहज अविर्भावाने युक्त असतो म्हणून तो सामान्य लोकांसारखा लोकव्यवहार पाळत जरी असला तरी व्यवहारातील आसक्तीपासून मुक्त असतो. त्याचा देह चारचौघांसारखा व्यवहारात वावरणारा जरी दिसला तरी तो देहबुद्धी पासून मुक्त असतो.
*********************

तो इंद्रियाचेनि खेळेमेळे । सुखे विषयामाजि लोळे ।
तरि विकाराचेनि विटाळे । कदाकाळे विटाळेना ॥

- कर्मेंद्रियांचा व्यवहार म्हणजेच प्रपंच करत असताना हे सर्व भगवद्रुप आहे ही भुमिका अखंड जागी असल्यामुळे तो विषय भोगत असताना सुद्धा "विषय तो त्यांचा झाला नारायण " या भुमिकेवर दॄढ असतो.
*********************

ज्यासी निजस्वरुपी नाहता । जाहली परम पवित्रता ।
तीर्थे मागती चरणतीर्था । ऐसी सुस्नातता मुक्ताची ॥

- गुरुंनी शिष्याला केलेला बोध म्हणजेच अनुग्रह हा त्याच्या स्वरुपानुसंधानाची दिलेली चावी आहे. एकांताच्या तिजोरीत हे स्वरुपसुखाचे धन तो कायम लुटत असतो. हे स्वरुपानुसंधान गुरुंच्या संकल्पाने शिष्यात संक्रमित झालेल्या योगशक्तीचे तीर्थच आहे. साधक जेव्हा सिद्ध होतो म्हणजे गुरुतत्वात विलीन होतो तेव्हा त्या स्वरुपसुखाच्या सरोवरात त्याचे अखंड स्नान होत असते. आत्मस्वरुपाचे अनुसंधान करणारा योगी ही भारतीय विचारधारेने मांडलेली पावित्र्याची परिसीमा आहे. तीर्थक्षेत्रांचे पाणीदेखील या सत्पुरुषांच्या चरणस्पर्षाने पावन होते. ही कल्पना नसून योगशास्त्राचे प्रयोगसिद्ध तत्व आहे. याच अर्थाच्या ओळी "शिवदीन केसरी " यांच्या अभंगात येतात. "गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी.. "

अवचटे ये त्याच्या मुखाबाहेरी । ज्यासी म्हणे तुज देवो तारी ।
त्यासी मी वावूनिया शिरी । ब्रम्हसाक्षात्कारी पाववी ॥

- असा महात्मा सहजपणे जरी एखाद्याला "तुला देव तारील असे म्हणाला " तरी त्याचा शब्द देव शिरावर वाहून घेतो आणि त्याला साक्षात्कारापर्यंत नेतो.
*************************************

सकळ देहशास्त्रसंपन्न । त्यासीही मुक्त न कळे जाण ।
देही असोनि ज्यासी देहाभिमान । त्यासी मुक्तलक्षण कळेना ॥

- चांगदेवांसारखा योगाभ्यासी सुद्धा संत ज्ञानेश्वरांचा अधिकार ओळखू शकला नाही. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती त्यांच्या गॄहस्थजीवनाची सुरुवात होण्याआधी नाशिकला अक्कलकोटस्वामींचे शिष्य "देवमामलेदार " यांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा त्यांनी स्वामींचा हात हातात घेऊन तुम्ही मोठे सत्पुरुष होणार आणि कार्य करणार असे म्हटले. मुक्तलक्षण कळण्यासाठी देहबुद्धी वळून आत्मबुद्धी होणे आवश्यक आहे. देहाभिमान हा स्थूल देहाचा म्हणजे रुपाचा आणि त्या शरीराने केलेल्या कर्तॄत्वाचा असू शकतो. साधन उत्तम चालत असताना त्यायोगे सुक्ष्मदेहात काही अनूभूती येतात. पण त्यामुळे अभिनिवेष तयार होतो. हा सुक्ष्मदेहाचा देहाभिमान आहे. याचा परिणाम म्हणून उपासकांमध्ये सुद्धा उपासनेच्या अनुभवांना अनुलक्षून मतभेद होत रहातात. स्थूल आणि सुक्ष्म या दोन्ही देहांचा अभिमान जोवर आहे तोवर मुक्त पुरुष दिसूनदेखील त्यावर विश्वास बसत नाही.

*************************************

Sunday, April 19, 2009

ज्ञानेश्वरी- प्रा. के. वि. बेलसरे यांची निरुपणे.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सत्शिष्य पूज्य बेलसरे बाबा अलिकडच्या काळातील एक थोर व्यक्तित्व होवून गेले। विज्ञानयुगातील साक्षर समाजाची सनातन तत्वज्ञानावरील (फिलॉसॉफिया पेरेनीज) निष्ठा डळमळीत होत असताना या महापुरुषाने काळानुरुप बदलणा-या भाषेत आपल्या जीवनातील अध्यात्मविचाराचा प्रयोगसिद्ध आलेख लोकांसमोर मांडला आणि तो कुठलाही अभिनिवेष न बाळगता !

सिद्धार्थ कॉलेजमध्ये तत्वज्ञानासारखा रटाळ विषय बेलसरे बाबांनी रसाळपणे मांडला.

सॉक्रेटिस,प्लेटो अरिस्टॉटल पासून ते बर्ट्रॉन्ड रसेल, ब्रॅडले सारख्या नवमतवादी विचारवंतांच्या तत्वचिंतनाचा परामर्श घेताना ज्ञानेश्वरी आणि गाथेसारख्या सनातन तत्वज्ञानाचा विसर त्यांनी पडू दिला नाही. रसिक परंतु संयमी, भाविक पण भाबडेपण नाही, बुद्धीवादी परंतु दुराग्रही नाही, प्रेमळ असून असंग, आस्तिक पण नास्तिकमतांतरातील विचार साक्षेपीपणे अभ्यासणारा, तत्वचिंतक पण रुक्ष नाही...बेलसरे बाबांचे व्यक्तित्व असे बहुपेडी होते.

उत्तम काव्य, अभिजात संगीत आणि साहित्य यांचा रसिकवॄत्तीने आस्वाद घेत एक आनंदपूर्ण जीवन जगताना शाश्वताचा शोध घेणारा मुमुक्षू आणि त्यांची प्रयोगसिद्ध भूमिका मांडणारा बुद्धीवादी अशी बाबांची वैचारिक बैठक होती.

त्यांचे आत्मचरित्र आनंद साधना हा त्यांच्या अध्यात्मसाधनेचा अत्यंत ॠजू भावाने मांडलेला प्रांजळ पट आहे.
बेलसरे बाबांनी मालाडला त्यांच्या राहत्या घरी ज्ञानेश्वरीचे चौसष्ट वर्षे निरुपण केले.

मराठी अक्षरसाहित्याचा मेरुमणी असणारा हा ग्रंथ बाबांच्या निरुपणातून आधुनिक दॄष्टीकोनांचे लेणे घेऊन सजला.
हे वर्ष बेलसरे बाबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे हा योग साधून या निरुपणांचे प्रकाशन अमॄतानुभव ज्ञानवर्धिनी ट्रस्ट तर्फे होत आहे. त्यापैकी पहिला खंड नुकताच प्रकाशित झाला आहे.

त्यातील निवडक भाग येथे देत आहे.

(पुस्तकासाठीचा संपर्क- श्रीकॄष्ण दाभोळकर- ९९३०९४९००७ / 9930949007)

*******************************

जैसे शारदियेचे चंद्रकळे

जैसे शारदियेचे चंद्रकळे । माजि अमृतकण कोवळे।
ते वेचिती मने मवाळे । चकोरतलगे ॥

याचा अर्थ असा की शरदॠतू म्हणजे थंडीचा काळ, त्यामध्ये पौर्णीमा आली की आकाश स्वच्छ असते.
आकाश स्वच्छ आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र प्रकाशू लागल्यावर मनाला शांत करणारे चांदणे असते.

कल्पना अशी आहे की त्या प्रकाशामध्ये अमॄताचे कण असतात.
हा एक कविसंकेत आहे. त्या कोवळ्या अमॄतकणांचे सेवन चकोराचे पिल्लू करते.

ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाषाप्रभूच !
त्यांनी म्हटले आहे. चकोरतलगे. तलग म्हणजे "पिलू".
चकोर पक्षी आहे म्हणजे तो आकाशात विहार करतो, हे पिलू आले त्याला उडता येत नाही म्हणून ते जमीनीवरच चालणार. तलग म्हणजे तलावर (जमीनीवर) चालणारे. अतिशय नाजूक असते ते.

ते चकोराचे पिलू आईने वेचून आणलेले प्रकाशाचे कोवळे अमॄतकण सेवन करते तसे या ग्रंथाचे सेवन करावे.
याचा खरा अर्थ असा की मला भक्तीच्या आकाशात संचार करता येत नाही. असा मी अज्ञ आहे. त्या अज्ञानाची जाणीव ठेवून हा ग्रंथ वाचावा.

या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे आणि त्यात कोवळे अमॄतकण आहेत.

ते जे नाजूक आहे ते भगवंताचे प्रेम आहे. मला कळत नाही असे म्हणून लहान होवून त्याचे सेवन करा.
माणसामध्ये ही शक्ती आहे की तो वयाने मोठा जरी असला तरी लहान मुल बनू शकतो.
सगळे संत भगवंतासमोर लहान मुल झाले म्हणून संतपदवी पर्यंत पोहोचू शकले हे ध्यानात ठेवावे.

उपनिषदांनी तर सांगितलेच आहे- पांडित्यं निर्वेद्य बाल्येन तिष्ठासेत्‌ ॥
वेद्य म्हणजे जाणणे. पांडित्य विसरून बालवॄत्ती झाली की ते कळते.

मला कळत नाही असे खरे वाटून जर मनुष्य बाल वॄत्तीचा झाला तर तो संतांना प्रिय होईल.
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की त्या चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञानकण मिळतील।

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतेसे काष्ठ कोरडे ।
परि कळिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणे । परि ते कमलदल चिरू नेणे ।
तैसे कठीण कोवळेपणे । स्नेह देखा ॥

आता ज्ञानेश्वर महाराजांचा दॄष्टांत बघा.
काय अप्रतिम आहे. जे शंभर टक्के लागू पडणारे दॄष्टान्त आहेत त्यातला हा आहे.
भुंगा असतो ना, तो अत्यंत सहजपणे मोठीमोठी लाकडे पोखरतो.
तो कमळात जाऊन बसला की संध्याकाळी कमळ मिटते. त्यात तो अडकतो.
त्याला त्या पाकळ्या चिरणे कठीण नाही. पण त्या पाकळ्या तो चिरत नाही. त्या भुंग्याला त्या पाकळ्या चिरणे अशक्य आहे काय? तो प्राण देतो पण पाकळ्या चिरत नाही. हे प्रेम म्हणजे किती कोवळे आहे.

स्नेह म्हणजे प्रेम. तेल तूप याला सुद्धा स्नेह म्हणतात. म्हणजे चिकट असणे आणि अखंड प्रवाही असणे. हा गुण प्रेमात सुद्धा आहे. नाजूक, कोवळे पण कठीण आहे.

उदाहरण सांगतो म्हणजे याचा अर्थ अधिक स्पष्ट होईल.
महात्मा गांधी होते ना.
खरा वैरागी पुरुष यात शंका नाही.
त्यांचे राजकारण जाऊ दे.
पण खरा वैरागी पुरुष, सर्व सोडलेले असे.
त्यांना पुण्याला आगाखान पॅलेसमधे ठेवले होते.
तेव्हा तिथे बा आजारी पडल्या.बेशुद्ध होत्या. अधून मधून गांधी यायचे व बघायचे.
डॉक्टरांना विचारायचे कशी आहे प्रकॄती?

त्या गेल्यानंतर त्यांना चितेवर ठेवले अग्नी दिला आणि गांधींना एकदम रडायला आले, उसासाच आला.
कसे प्रेम असेल आतमध्ये? ज्या स्त्रीने आपल्याला एवढी वर्षे साथ दिली, आपल्याबरोबर कष्ट सोसले ती जाणार म्हटल्यावर त्यांनासुद्धा दुःख झाले. वैराग्यशील पुरुषाच्या अंगीसुद्धा कसे प्रेम आत असते.
लोकमान्यांना सहा वर्षे शिक्षा झाली आणि त्यांच्या पत्नीने खाणेच सोडले. त्या गेल्यानंतर लोकमान्यांनी आठवणीत लिहिले आहे. "मी हादरलो पण असली दुःखे माणसाने मुकाटपणे सोसली पाहिजेत".
हे लोक बाहेरून जरी कठोर असले तरी ज्यांच्याशी त्यांचा संबंध येतो त्यांच्यावर त्यांचे प्रेम असते यात शंकाच नाही.

तुकाराम महाराजांची पत्नी गेली ती दुष्काळात अन्न खायला नाही म्हणून गेली.
काय त्या पुरुषाला यातना झाल्या असतील.
ज्या पुरुषामध्ये भगवंतावर अलोट प्रेम करण्याचे सामर्थ्य होते त्यांचे पत्नीवर प्रेम नसेल का?
हे सर्व सांगण्याचा हेतू काय तर "तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा ".

Tuesday, February 24, 2009

श्रमाची सापेक्षता - पूज्य बाबामहाराज आर्वीकर

सोलापूर मंगळवेढे मार्गावर माचणूर नांवाचे एक लहानसे खेडे आहे.
भीमा नदी या ठिकाणी चंद्रकोरीसारखे वळण घेते म्हणून तिला इथून पुढे "चंद्रभागा" असे म्हणतात.
इथं अहिल्याबाई होळ्करांनी जीर्णोद्धार केलेले सिद्धेश्वराचे प्राचीन आणि रम्य देवालय आहे.
अजूनही शहरीपणाचा फार संपर्क नसल्याने इथलं निसर्गसौंदर्य टिकून आहे.
इथंच पूज्य बाबामहाराज आर्वीकर नांवाचे एक थोर संत होवून गेले.
त्यांनी लिहीलेल्या साधक विहार सुत्रे या ग्रंथातील हा एक अंश आहे.

****************************************


गणिते सोडवण्याची जशी एक रीत असते तशीच विचार करण्याची सुद्धा एक रीत असते.
विचार करण्याची शास्त्रीय व्यवस्था जाणून घेतली की असंतोष निर्माण होत नाही.
अपेक्षा कमीत कमी करीत आणल्या पाहिजेत.
खूपखूप श्रमावे पण अपेक्षांच्या दारांना कुलुपे लावून ठेवावीत.
निवॄत्त भावनेने वागावे. निवॄत्त भावनेमुळे चित्तात प्रसन्नतेचा प्रसाद टिकू शकतो.
अपेक्षाभंगाचे क्षण निर्माण होवू लागले की चित्त अप्रसन्न होते. ज्ञानतंतूंचा विकार न व्हावा यासाठी चित्ताची प्रसन्नता जोपासणे आवश्यक आहे.

निवृत्तभावाचा अर्थ मला काही नको असा नाही. मला काही नको असे वाटणे हीसुद्धा एक प्रवॄत्तीच आहे.
मला काही नको यापेक्षा मला काय हवे आहे हे नेमके मोजता आले पाहिजे. हीच निवॄत्त होण्याची कला आहे. योग्याला आग्रह वर्ज्य असावा. मोजके ते घ्यावे, नेटके ते घ्यावे म्हणजे नको ते आपोआपच गळून पडते.

एखादा अव्यक्त विचार अथवा भाव कॄतीमधून प्रकट करणे याला श्रम असे नांव आहे. हा सॄष्टीचा सहजस्वभाव आहे.
एकातून दुसरी अभिव्यक्ती, दुसर्‌यातून तिसरी अभिव्यक्ती हे अखंडपणे सॄष्ट होत असते. या श्रमयोगाला वेदकालात "तप" अशी संज्ञा होती.

जीवसुखार्थ चिंतनशील असणा-या कार्ल मार्क्स सारख्या महापुरुषांनीही या श्रमविभागाचा खूप सखोल असा विचार केला आहे. श्रमाची सापेक्षता मार्क्स ने "अर्थ" ही ठरविली. त्यामुळेच का होईना "अर्थ" म्हण्जेच पुरुषार्थ असे त्याने म्हटले. त्याने पाहिले की मानवी पुरुषार्थाचे मोजमाप "पैश्यात बद्ध" आहे. राष्ट्रा राष्ट्रांची इभ्रत, महानता, वैभव सारे पैश्यात साठले आहे. श्रमशक्तीचा अविर्भाव जेव्हा द्र्व्यात म्हणजेच पैश्यात होईल तेव्हा श्रमिकाला त्याचा योग्य मोबदला मिळावा हा मार्कस चा सिद्धांत आहे.

वेदकालानेही श्रम ह्या विश्वाच्या आदि घट्काचा विचार केला आहे.

मार्क्सने श्रमाचे मुल्यांकन पैश्यात केले पण उपनिषदांनी विचारी माणसास असे विचारले आहे की "पैसा अखेरीस माणसास काय देतो?"
पैसा माणसास भोग देतो. स्वास्थ्य देत नाही.
म्हणजे उपनिषद म्हणतात की श्रमातून मिळालेला पैसा भोग देतो पण भोगवॄत्ती बळावली की श्रमशक्तीचा -हास होतो.

ज्या श्रमांनी श्रमशक्तीचा -हास न होता ती निरोगीपणे वाढू लागेल त्या श्रमांना "तप" असे नांव आहे.
या श्रमातून प्राप्त काय व्हावयाचे आहे तर "ज्ञान".

श्रमाचे मुल्यांकन ज्ञान आहे भोग नव्हे हा महत्वपूर्ण सिद्धांत उपनिषदांनी मांडला आहे.

भोगातून तयार होणा-या स्मॄतीरूप पदार्थस्थित जाणिवेला "ज्ञान न म्हणता अज्ञान म्हटले आहे". श्रमाचा उपयोग जाणिवेच्या चिरंतन विकासाकडे करत जाणे यालाच "तप" असे म्हटले आहे.

देवभक्तावर श्रम करण्याची विशेष जबाबदारी आहे.
साधकाने नित्य श्रमिक राहिले पाहिजे.

"श्रम किंवा तप" याचा अर्थ रुढपणे देह कष्टवणे असा नाही" असे दुराग्रही लोक ज्ञानप्राप्तीपासून दूर जातात असे उपनिषदांचे स्पष्ट म्हणणे आहे.

म्हणून आग्रह योग्यासाठी त्याज्य आहे. साधक अनाग्रही वॄत्तीचा परंतु संयमी असला पाहिजे.
निरंतर श्रमशील असणा-या तपस्व्याला वेदांनी "श्रमण" असे ना्व दिले आहे.

श्रमाचे रुपांतर भोगात नव्हे तर ज्ञानात करण्यासाठी निरंतर श्रमशील रहा आणि समर्थ बना असा उपनिषदांचा संदेश आहे.
राष्ट्रसेवक, समाजसेवक, हरिभक्त, क्रांतीवीर, पतिव्रता, कुटुंबाकरिता आपली हाडे झिजविणारा, अतिथी अभ्यागतांचा योगक्षेम चालवणारा, असे सर्व लोक या "श्रमण" शब्दात सामावले आहेत.

भोगाच्या स्वार्थी अपेक्षेने श्रम जड होवू लागतात आणि चैतन्य पदार्थबद्ध होवून श्रमशक्तीचा -हास होतो तर स्वार्थशून्य श्रमातून आपल्या आत असणा-या चैतन्यशक्तीचा योग्य विकास आणि परिचय होवू लागतो.

या चैतन्यशक्तीच्या ज्ञानाला "ऋत" असे वेदांनी म्हटले आहे.

भगवंतानी हे उपनिषदांचे सार अर्जूनाला सोप्या शब्दात समजावून दिले.
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"..

कर्मातून प्राप्त होणारा संवेद्य घटक म्हणजे पैसा आणि समाजातील तद्रूप उपाधी यांचा उपयोग..
हा उपयोग स्वार्थशून्य भावनेने करण्याचा, "क्रमाने उत्क्रांत होत जाणारा अभ्यास" यालाच गीतेचे प्रधान अंग म्हटले आहे.

फळाची अपेक्षा नसणे याचा अर्थ फल अस्वीकार करणे नसून त्याचा विनियोग इतरांच्या उत्थानासाठी करणे हे कर्मयोगाचे सूत्र आहे.

Monday, December 10, 2007

"अ सर्च इन सिक्रेट इंडिया"

पॉल ब्रन्टन हा एक ब्रिटीश पत्रकार... गुढविद्देच्या प्रत्यक्ष अनुभवांसाठी भारतात येवून तो अनेक साधूपुरुषांना भेटला. अरुणाचलम च्या श्री रमण महर्षिंची भेट होवून तो कॄतार्थ झाला. भारताच्या वास्तव्यातील अध्यात्मिक अनुभवांना त्याने "अ सर्च इन सिक्रेट इंडिया" या पुस्तकात शब्दबद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद ग. नी. पुरंदरे यांनी मराठीत केला आहे. तो वोरा आणि कंपनी तर्फे प्रकाशित झाला आहे. त्या पुस्तकातील या ओळी आहेत...

उदबत्तीच्या सुवासाची धुम्रवलये नेहेमीप्रमाणे वरती लाकडी आढ्यापर्यंत तरंगत होती.मी खाली बैठक मारून बसलो आणि महर्षिंकडे दॄष्टी केंद्रित केली. पण थोड्या वेळाने असे वाटू लागले की डोळे मिटून घ्यावेत आणि लवकरच मला तंद्री लागली. अर्धवट निद्रा म्हणा, महर्षिंच्या सानिध्यात बसल्याचा परिणाम म्हणा...मनाला काय पण शांती वाटली ! शेवटी माझ्या जागॄतावस्थेचा थोडासा भंग झाला व मला एक स्पष्ट स्वप्न पडले...

स्वप्न असे - मी पाच वर्षाचा एक लहान मुलगा आहे.अरुणाचलमच्या त्या पवित्र टेकडीवर जाण्याकरिता जो नागमोडी रस्ता आहे त्यावर मी उभा आहे.माझ्या शेजारी महर्षि आहेत. त्याचा मी हात धरला आहे. पण महर्षिंची मुर्ती एकदम भव्य! एखाद्या महापुरुषासारखी....ते मला आश्रमापासून दूर नेत आहेत आणि रात्रीच्या गडद अंधारामधून ते मला एका रस्त्यावरून घेऊन चालले आहेत. रस्त्यावरून आम्ही दोघे सावकाश चालत आहोत.थोड्या वेळाने तारे आणि चंद्र अंधुकसा प्रकाश आमच्या सभोवताली टाकत आहेत.महर्षि मला त्या खडकाळ जमिनीवरून खाचखळगे , मोठे धोंडे यातून वाचवत सांभाळून नेत आहेत. डोंगर उंच आहे व त्यावर आम्ही सावकाशपणे चढत आहोत. मोठ्या शिलाखंडांवरच्या फटीत किंवा खुजट झुडुपांच्या जाळी मध्ये खाली दडलेल्या अशा गुहा आहेत. आणि त्यामध्ये आश्रमासारखी वस्ती आहे. आणि आम्ही जवळून जात असताना ते आश्रमवासी लोक बाहेर येवून आम्हाला नमस्कार करीत आहेत आणि आमचे स्वागत करीत आहेत.त्यांचे आकार ता-यांच्या प्रकाशात भूतांसारखे दिसत असले तरीही ते वेगवेगळ्या श्रॆणींचे योगी असावेत हे मी ओळखले.आम्ही त्यांच्याशी बोलायला न थांबता थेट डोंगराच्या माथ्या पर्यंत वाटचाल करीत होतो. शेवटी आम्ही शिखर गाठले.आता काही महत्वाची घटना घडून येणार अशा विलक्षण अपेक्षेने माझ्या ह्रदयाचे ठोके जोरजोरात पडु लागले.

महर्षिंनी वळून माझ्याकडे न्याहळून पाहिले. मी ही त्यांच्याकडे मोठ्या उत्सुकतेने पहात राहिलो. माझ्या ह्र्दयात आणि मनात एक विलक्षण बदल मोठ्या झपाट्याने होत आहे असे मला समजून आले. ज्या उद्देशाने मी या शोधाकरीता बाहेर पडलो तो उद्देश माझ्या मनातून पार निघून जाउ लागला. जो उद्देश मनाशी धरून मी एवढी पायपीट केली, त्या इच्छा कमालीच्या वेगाने वितळून जाउ लागल्या , नाहीश्या होऊ लागल्या. माझ्या मित्रांपैकी, पुष्कळांशी वागताना ज्या आवडी निवडी, गैरसमजूती, औदासिन्य, स्वार्थ मी उराशी बाळ्गीत होतो त्यात काहीएक अर्थ नव्हता हे आता मला स्पष्ट दिसून येवू लागले. जिचे वर्णन करता येणार नाही अशी कमालीची शांतता, मुग्धता मी अनुभवू लागलो. या जगाकडून , संसारातून मला मागण्यासारखे काही उरले नाही ही जाणीव मला प्रकर्षाने होवू लागली.आणि एकदम महर्षिंनी मला त्या टेकडीच्या पायथ्याशी पहावयास सांगितले. मी ताबडतोब त्यांची आज्ञा पाळली आणि काय आश्चर्य ! खाली पॄथ्वीचा पश्चिम गोलार्ध दूरवर पसरलेला माझ्या नजरेस पडला. त्यात लाखो लोक वस्ती करून राहिले आहेत. ती माणसे मला अंधूक अंधूक दिसत होती; कारण अजून रात्रच होती व अंधारात त्यांच्या आकॄत्या स्पष्टपणे दिसत नव्हत्या. आणि एकदम महर्षिंचे शब्द माझ्या कानी आले..." हे पहा आता तू जेव्हा तिकडे परत जाशील तेव्हा आता जी शांतमनस्कता तू अनुभवीत आहेत ती शांतमनस्कता तशीच ठेव, त्याची किंमत मॊठी आहे. देहभावना अहंभावना पूर्णपणे टाकून दे. ही शांतमनस्कता तुझ्यामध्ये जेव्हा संचरू लागेल, तेव्हा तू स्वतःला पार विसरून जाशील ; कारण त्या वेळी तुला तत्वाचा बोध झालेला असेल. "आणि महर्षिंनी रुपेरी प्रकाशाच्या धाग्याचे एक टॊक माझ्या हातात ठेवले....

नंतर मी त्या विलक्षण स्पष्ट अश्या स्वप्नातून जागा झालो. त्या भेदक भव्य स्वप्नात अजून माझे मन रमून गेले होते. जागा झाल्याबरोबर महर्षिंचे डोळे माझ्या डोळ्यांबरोबर भिडले.त्यांचा चेहरा माझ्याकडे वळला आणि ते टक लावून माझ्या कडे पाहू लागले....

Thursday, November 22, 2007

सर्व सोडूनि ह्रदयाकाशी, सद्गुरु शोधावा मायबाप..

परमगुरु ब्रम्हलीन श्री नानामहाराज तराणेकर यांचे ओवीबद्ध चरित्र "मार्तण्ड महिमा" या ग्रंथातून या ओव्या घेतल्या आहेत. ग्रंथरचनाकार श्री विजय पागे, यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना पूज्य श्री नानांच्या मुखातून आलेले हे उपदेशामॄत आहे.


सदबोध संतांचा सेवित अखंडित
जाणावे द्वैतांतले ब्रम्ह प्रकाशित
साधन आराधने समाधीत
भोगावे आपण आनंदाने...

अनुसंधान मात्र नित्य,
असावे साधकाचे आर्त जागॄत,
सावधमने सदा सत्य,
शोधावे पुन्हा, ह्रदयातचि...

न शोधावे गुरुस आपण,
करीत रहावे ठायीच साधन,
घडता विभुतिंचे पथात दर्शन,
घ्यावे मात्र तळमळीने...

खरे सद्गुरु करुणावत्सल,
परिपक्व पहाता साधना सुफल,
कराया धावती शिष्याजवळ,
असे श्रद्धा बलवत्तर जरी..

श्वासोश्वासी घ्यावे,
ह्रदयतालावरी दंग व्हावे,
टाहो फोडोनि हाकारावे,
सदुरुंसी आपल्या उत्कटपणे...

उदरार्थ करणे कर्तव्य नियत,
एरवी एकांती शांत चित्त,
वॄत्ती एकवटोनि जगांत,
खेळते चैतन्य पहावे भावे...

धुंडाळाल जितुके वेदशास्त्रासि,
तितुके पहाल विधीनिषेधासी,
सर्व सोडूनि ह्रदयाकाशी,
सद्गुरु शोधावा मायबाप..