पॉल ब्रन्टन हा एक ब्रिटीश पत्रकार... गुढविद्देच्या प्रत्यक्ष अनुभवांसाठी भारतात येवून तो अनेक साधूपुरुषांना भेटला. अरुणाचलम च्या श्री रमण महर्षिंची भेट होवून तो कॄतार्थ झाला. भारताच्या वास्तव्यातील अध्यात्मिक अनुभवांना त्याने "अ सर्च इन सिक्रेट इंडिया" या पुस्तकात शब्दबद्ध केले. त्याचा मराठी अनुवाद ग. नी. पुरंदरे यांनी मराठीत केला आहे. तो वोरा आणि कंपनी तर्फे प्रकाशित झाला आहे. त्या पुस्तकातील या ओळी आहेत...
उदबत्तीच्या सुवासाची धुम्रवलये नेहेमीप्रमाणे वरती लाकडी आढ्यापर्यंत तरंगत होती.मी खाली बैठक मारून बसलो आणि महर्षिंकडे दॄष्टी केंद्रित केली. पण थोड्या वेळाने असे वाटू लागले की डोळे मिटून घ्यावेत आणि लवकरच मला तंद्री लागली. अर्धवट निद्रा म्हणा, महर्षिंच्या सानिध्यात बसल्याचा परिणाम म्हणा...मनाला काय पण शांती वाटली ! शेवटी माझ्या जागॄतावस्थेचा थोडासा भंग झाला व मला एक स्पष्ट स्वप्न पडले...
स्वप्न असे - मी पाच वर्षाचा एक लहान मुलगा आहे.अरुणाचलमच्या त्या पवित्र टेकडीवर जाण्याकरिता जो नागमोडी रस्ता आहे त्यावर मी उभा आहे.माझ्या शेजारी महर्षि आहेत. त्याचा मी हात धरला आहे. पण महर्षिंची मुर्ती एकदम भव्य! एखाद्या महापुरुषासारखी....ते मला आश्रमापासून दूर नेत आहेत आणि रात्रीच्या गडद अंधारामधून ते मला एका रस्त्यावरून घेऊन चालले आहेत. रस्त्यावरून आम्ही दोघे सावकाश चालत आहोत.थोड्या वेळाने तारे आणि चंद्र अंधुकसा प्रकाश आमच्या सभोवताली टाकत आहेत.महर्षि मला त्या खडकाळ जमिनीवरून खाचखळगे , मोठे धोंडे यातून वाचवत सांभाळून नेत आहेत. डोंगर उंच आहे व त्यावर आम्ही सावकाशपणे चढत आहोत. मोठ्या शिलाखंडांवरच्या फटीत किंवा खुजट झुडुपांच्या जाळी मध्ये खाली दडलेल्या अशा गुहा आहेत. आणि त्यामध्ये आश्रमासारखी वस्ती आहे. आणि आम्ही जवळून जात असताना ते आश्रमवासी लोक बाहेर येवून आम्हाला नमस्कार करीत आहेत आणि आमचे स्वागत करीत आहेत.त्यांचे आकार ता-यांच्या प्रकाशात भूतांसारखे दिसत असले तरीही ते वेगवेगळ्या श्रॆणींचे योगी असावेत हे मी ओळखले.आम्ही त्यांच्याशी बोलायला न थांबता थेट डोंगराच्या माथ्या पर्यंत वाटचाल करीत होतो. शेवटी आम्ही शिखर गाठले.आता काही महत्वाची घटना घडून येणार अशा विलक्षण अपेक्षेने माझ्या ह्रदयाचे ठोके जोरजोरात पडु लागले.
महर्षिंनी वळून माझ्याकडे न्याहळून पाहिले. मी ही त्यांच्याकडे मोठ्या उत्सुकतेने पहात राहिलो. माझ्या ह्र्दयात आणि मनात एक विलक्षण बदल मोठ्या झपाट्याने होत आहे असे मला समजून आले. ज्या उद्देशाने मी या शोधाकरीता बाहेर पडलो तो उद्देश माझ्या मनातून पार निघून जाउ लागला. जो उद्देश मनाशी धरून मी एवढी पायपीट केली, त्या इच्छा कमालीच्या वेगाने वितळून जाउ लागल्या , नाहीश्या होऊ लागल्या. माझ्या मित्रांपैकी, पुष्कळांशी वागताना ज्या आवडी निवडी, गैरसमजूती, औदासिन्य, स्वार्थ मी उराशी बाळ्गीत होतो त्यात काहीएक अर्थ नव्हता हे आता मला स्पष्ट दिसून येवू लागले. जिचे वर्णन करता येणार नाही अशी कमालीची शांतता, मुग्धता मी अनुभवू लागलो. या जगाकडून , संसारातून मला मागण्यासारखे काही उरले नाही ही जाणीव मला प्रकर्षाने होवू लागली.आणि एकदम महर्षिंनी मला त्या टेकडीच्या पायथ्याशी पहावयास सांगितले. मी ताबडतोब त्यांची आज्ञा पाळली आणि काय आश्चर्य ! खाली पॄथ्वीचा पश्चिम गोलार्ध दूरवर पसरलेला माझ्या नजरेस पडला. त्यात लाखो लोक वस्ती करून राहिले आहेत. ती माणसे मला अंधूक अंधूक दिसत होती; कारण अजून रात्रच होती व अंधारात त्यांच्या आकॄत्या स्पष्टपणे दिसत नव्हत्या. आणि एकदम महर्षिंचे शब्द माझ्या कानी आले..." हे पहा आता तू जेव्हा तिकडे परत जाशील तेव्हा आता जी शांतमनस्कता तू अनुभवीत आहेत ती शांतमनस्कता तशीच ठेव, त्याची किंमत मॊठी आहे. देहभावना अहंभावना पूर्णपणे टाकून दे. ही शांतमनस्कता तुझ्यामध्ये जेव्हा संचरू लागेल, तेव्हा तू स्वतःला पार विसरून जाशील ; कारण त्या वेळी तुला तत्वाचा बोध झालेला असेल. "आणि महर्षिंनी रुपेरी प्रकाशाच्या धाग्याचे एक टॊक माझ्या हातात ठेवले....
नंतर मी त्या विलक्षण स्पष्ट अश्या स्वप्नातून जागा झालो. त्या भेदक भव्य स्वप्नात अजून माझे मन रमून गेले होते. जागा झाल्याबरोबर महर्षिंचे डोळे माझ्या डोळ्यांबरोबर भिडले.त्यांचा चेहरा माझ्याकडे वळला आणि ते टक लावून माझ्या कडे पाहू लागले....
1 comment:
सुंदर. आणखी भाषांतर येऊ द्या !
Post a Comment