भीमा नदी या ठिकाणी चंद्रकोरीसारखे वळण घेते म्हणून तिला इथून पुढे "चंद्रभागा" असे म्हणतात.
इथं अहिल्याबाई होळ्करांनी जीर्णोद्धार केलेले सिद्धेश्वराचे प्राचीन आणि रम्य देवालय आहे.
अजूनही शहरीपणाचा फार संपर्क नसल्याने इथलं निसर्गसौंदर्य टिकून आहे.
इथंच पूज्य बाबामहाराज आर्वीकर नांवाचे एक थोर संत होवून गेले.
त्यांनी लिहीलेल्या साधक विहार सुत्रे या ग्रंथातील हा एक अंश आहे.
****************************************
गणिते सोडवण्याची जशी एक रीत असते तशीच विचार करण्याची सुद्धा एक रीत असते.
विचार करण्याची शास्त्रीय व्यवस्था जाणून घेतली की असंतोष निर्माण होत नाही.
अपेक्षा कमीत कमी करीत आणल्या पाहिजेत.
खूपखूप श्रमावे पण अपेक्षांच्या दारांना कुलुपे लावून ठेवावीत.
निवॄत्त भावनेने वागावे. निवॄत्त भावनेमुळे चित्तात प्रसन्नतेचा प्रसाद टिकू शकतो.
अपेक्षाभंगाचे क्षण निर्माण होवू लागले की चित्त अप्रसन्न होते. ज्ञानतंतूंचा विकार न व्हावा यासाठी चित्ताची प्रसन्नता जोपासणे आवश्यक आहे.
निवृत्तभावाचा अर्थ मला काही नको असा नाही. मला काही नको असे वाटणे हीसुद्धा एक प्रवॄत्तीच आहे.
मला काही नको यापेक्षा मला काय हवे आहे हे नेमके मोजता आले पाहिजे. हीच निवॄत्त होण्याची कला आहे. योग्याला आग्रह वर्ज्य असावा. मोजके ते घ्यावे, नेटके ते घ्यावे म्हणजे नको ते आपोआपच गळून पडते.
एखादा अव्यक्त विचार अथवा भाव कॄतीमधून प्रकट करणे याला श्रम असे नांव आहे. हा सॄष्टीचा सहजस्वभाव आहे.
एकातून दुसरी अभिव्यक्ती, दुसर्यातून तिसरी अभिव्यक्ती हे अखंडपणे सॄष्ट होत असते. या श्रमयोगाला वेदकालात "तप" अशी संज्ञा होती.
जीवसुखार्थ चिंतनशील असणा-या कार्ल मार्क्स सारख्या महापुरुषांनीही या श्रमविभागाचा खूप सखोल असा विचार केला आहे. श्रमाची सापेक्षता मार्क्स ने "अर्थ" ही ठरविली. त्यामुळेच का होईना "अर्थ" म्हण्जेच पुरुषार्थ असे त्याने म्हटले. त्याने पाहिले की मानवी पुरुषार्थाचे मोजमाप "पैश्यात बद्ध" आहे. राष्ट्रा राष्ट्रांची इभ्रत, महानता, वैभव सारे पैश्यात साठले आहे. श्रमशक्तीचा अविर्भाव जेव्हा द्र्व्यात म्हणजेच पैश्यात होईल तेव्हा श्रमिकाला त्याचा योग्य मोबदला मिळावा हा मार्कस चा सिद्धांत आहे.
वेदकालानेही श्रम ह्या विश्वाच्या आदि घट्काचा विचार केला आहे.
मार्क्सने श्रमाचे मुल्यांकन पैश्यात केले पण उपनिषदांनी विचारी माणसास असे विचारले आहे की "पैसा अखेरीस माणसास काय देतो?"
पैसा माणसास भोग देतो. स्वास्थ्य देत नाही.
म्हणजे उपनिषद म्हणतात की श्रमातून मिळालेला पैसा भोग देतो पण भोगवॄत्ती बळावली की श्रमशक्तीचा -हास होतो.
ज्या श्रमांनी श्रमशक्तीचा -हास न होता ती निरोगीपणे वाढू लागेल त्या श्रमांना "तप" असे नांव आहे.
या श्रमातून प्राप्त काय व्हावयाचे आहे तर "ज्ञान".
श्रमाचे मुल्यांकन ज्ञान आहे भोग नव्हे हा महत्वपूर्ण सिद्धांत उपनिषदांनी मांडला आहे.
भोगातून तयार होणा-या स्मॄतीरूप पदार्थस्थित जाणिवेला "ज्ञान न म्हणता अज्ञान म्हटले आहे". श्रमाचा उपयोग जाणिवेच्या चिरंतन विकासाकडे करत जाणे यालाच "तप" असे म्हटले आहे.
देवभक्तावर श्रम करण्याची विशेष जबाबदारी आहे.
साधकाने नित्य श्रमिक राहिले पाहिजे.
"श्रम किंवा तप" याचा अर्थ रुढपणे देह कष्टवणे असा नाही" असे दुराग्रही लोक ज्ञानप्राप्तीपासून दूर जातात असे उपनिषदांचे स्पष्ट म्हणणे आहे.
म्हणून आग्रह योग्यासाठी त्याज्य आहे. साधक अनाग्रही वॄत्तीचा परंतु संयमी असला पाहिजे.
निरंतर श्रमशील असणा-या तपस्व्याला वेदांनी "श्रमण" असे ना्व दिले आहे.
श्रमाचे रुपांतर भोगात नव्हे तर ज्ञानात करण्यासाठी निरंतर श्रमशील रहा आणि समर्थ बना असा उपनिषदांचा संदेश आहे.
राष्ट्रसेवक, समाजसेवक, हरिभक्त, क्रांतीवीर, पतिव्रता, कुटुंबाकरिता आपली हाडे झिजविणारा, अतिथी अभ्यागतांचा योगक्षेम चालवणारा, असे सर्व लोक या "श्रमण" शब्दात सामावले आहेत.
भोगाच्या स्वार्थी अपेक्षेने श्रम जड होवू लागतात आणि चैतन्य पदार्थबद्ध होवून श्रमशक्तीचा -हास होतो तर स्वार्थशून्य श्रमातून आपल्या आत असणा-या चैतन्यशक्तीचा योग्य विकास आणि परिचय होवू लागतो.
या चैतन्यशक्तीच्या ज्ञानाला "ऋत" असे वेदांनी म्हटले आहे.
भगवंतानी हे उपनिषदांचे सार अर्जूनाला सोप्या शब्दात समजावून दिले.
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"..
कर्मातून प्राप्त होणारा संवेद्य घटक म्हणजे पैसा आणि समाजातील तद्रूप उपाधी यांचा उपयोग..
हा उपयोग स्वार्थशून्य भावनेने करण्याचा, "क्रमाने उत्क्रांत होत जाणारा अभ्यास" यालाच गीतेचे प्रधान अंग म्हटले आहे.
फळाची अपेक्षा नसणे याचा अर्थ फल अस्वीकार करणे नसून त्याचा विनियोग इतरांच्या उत्थानासाठी करणे हे कर्मयोगाचे सूत्र आहे.
No comments:
Post a Comment