Sunday, April 19, 2009

ज्ञानेश्वरी- प्रा. के. वि. बेलसरे यांची निरुपणे.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे सत्शिष्य पूज्य बेलसरे बाबा अलिकडच्या काळातील एक थोर व्यक्तित्व होवून गेले। विज्ञानयुगातील साक्षर समाजाची सनातन तत्वज्ञानावरील (फिलॉसॉफिया पेरेनीज) निष्ठा डळमळीत होत असताना या महापुरुषाने काळानुरुप बदलणा-या भाषेत आपल्या जीवनातील अध्यात्मविचाराचा प्रयोगसिद्ध आलेख लोकांसमोर मांडला आणि तो कुठलाही अभिनिवेष न बाळगता !

सिद्धार्थ कॉलेजमध्ये तत्वज्ञानासारखा रटाळ विषय बेलसरे बाबांनी रसाळपणे मांडला.

सॉक्रेटिस,प्लेटो अरिस्टॉटल पासून ते बर्ट्रॉन्ड रसेल, ब्रॅडले सारख्या नवमतवादी विचारवंतांच्या तत्वचिंतनाचा परामर्श घेताना ज्ञानेश्वरी आणि गाथेसारख्या सनातन तत्वज्ञानाचा विसर त्यांनी पडू दिला नाही. रसिक परंतु संयमी, भाविक पण भाबडेपण नाही, बुद्धीवादी परंतु दुराग्रही नाही, प्रेमळ असून असंग, आस्तिक पण नास्तिकमतांतरातील विचार साक्षेपीपणे अभ्यासणारा, तत्वचिंतक पण रुक्ष नाही...बेलसरे बाबांचे व्यक्तित्व असे बहुपेडी होते.

उत्तम काव्य, अभिजात संगीत आणि साहित्य यांचा रसिकवॄत्तीने आस्वाद घेत एक आनंदपूर्ण जीवन जगताना शाश्वताचा शोध घेणारा मुमुक्षू आणि त्यांची प्रयोगसिद्ध भूमिका मांडणारा बुद्धीवादी अशी बाबांची वैचारिक बैठक होती.

त्यांचे आत्मचरित्र आनंद साधना हा त्यांच्या अध्यात्मसाधनेचा अत्यंत ॠजू भावाने मांडलेला प्रांजळ पट आहे.
बेलसरे बाबांनी मालाडला त्यांच्या राहत्या घरी ज्ञानेश्वरीचे चौसष्ट वर्षे निरुपण केले.

मराठी अक्षरसाहित्याचा मेरुमणी असणारा हा ग्रंथ बाबांच्या निरुपणातून आधुनिक दॄष्टीकोनांचे लेणे घेऊन सजला.
हे वर्ष बेलसरे बाबांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे हा योग साधून या निरुपणांचे प्रकाशन अमॄतानुभव ज्ञानवर्धिनी ट्रस्ट तर्फे होत आहे. त्यापैकी पहिला खंड नुकताच प्रकाशित झाला आहे.

त्यातील निवडक भाग येथे देत आहे.

(पुस्तकासाठीचा संपर्क- श्रीकॄष्ण दाभोळकर- ९९३०९४९००७ / 9930949007)

*******************************

जैसे शारदियेचे चंद्रकळे

जैसे शारदियेचे चंद्रकळे । माजि अमृतकण कोवळे।
ते वेचिती मने मवाळे । चकोरतलगे ॥

याचा अर्थ असा की शरदॠतू म्हणजे थंडीचा काळ, त्यामध्ये पौर्णीमा आली की आकाश स्वच्छ असते.
आकाश स्वच्छ आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र प्रकाशू लागल्यावर मनाला शांत करणारे चांदणे असते.

कल्पना अशी आहे की त्या प्रकाशामध्ये अमॄताचे कण असतात.
हा एक कविसंकेत आहे. त्या कोवळ्या अमॄतकणांचे सेवन चकोराचे पिल्लू करते.

ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाषाप्रभूच !
त्यांनी म्हटले आहे. चकोरतलगे. तलग म्हणजे "पिलू".
चकोर पक्षी आहे म्हणजे तो आकाशात विहार करतो, हे पिलू आले त्याला उडता येत नाही म्हणून ते जमीनीवरच चालणार. तलग म्हणजे तलावर (जमीनीवर) चालणारे. अतिशय नाजूक असते ते.

ते चकोराचे पिलू आईने वेचून आणलेले प्रकाशाचे कोवळे अमॄतकण सेवन करते तसे या ग्रंथाचे सेवन करावे.
याचा खरा अर्थ असा की मला भक्तीच्या आकाशात संचार करता येत नाही. असा मी अज्ञ आहे. त्या अज्ञानाची जाणीव ठेवून हा ग्रंथ वाचावा.

या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे आणि त्यात कोवळे अमॄतकण आहेत.

ते जे नाजूक आहे ते भगवंताचे प्रेम आहे. मला कळत नाही असे म्हणून लहान होवून त्याचे सेवन करा.
माणसामध्ये ही शक्ती आहे की तो वयाने मोठा जरी असला तरी लहान मुल बनू शकतो.
सगळे संत भगवंतासमोर लहान मुल झाले म्हणून संतपदवी पर्यंत पोहोचू शकले हे ध्यानात ठेवावे.

उपनिषदांनी तर सांगितलेच आहे- पांडित्यं निर्वेद्य बाल्येन तिष्ठासेत्‌ ॥
वेद्य म्हणजे जाणणे. पांडित्य विसरून बालवॄत्ती झाली की ते कळते.

मला कळत नाही असे खरे वाटून जर मनुष्य बाल वॄत्तीचा झाला तर तो संतांना प्रिय होईल.
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की त्या चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञानकण मिळतील।

जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतेसे काष्ठ कोरडे ।
परि कळिकेमाजि सापडे । कोवळिये ॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणे । परि ते कमलदल चिरू नेणे ।
तैसे कठीण कोवळेपणे । स्नेह देखा ॥

आता ज्ञानेश्वर महाराजांचा दॄष्टांत बघा.
काय अप्रतिम आहे. जे शंभर टक्के लागू पडणारे दॄष्टान्त आहेत त्यातला हा आहे.
भुंगा असतो ना, तो अत्यंत सहजपणे मोठीमोठी लाकडे पोखरतो.
तो कमळात जाऊन बसला की संध्याकाळी कमळ मिटते. त्यात तो अडकतो.
त्याला त्या पाकळ्या चिरणे कठीण नाही. पण त्या पाकळ्या तो चिरत नाही. त्या भुंग्याला त्या पाकळ्या चिरणे अशक्य आहे काय? तो प्राण देतो पण पाकळ्या चिरत नाही. हे प्रेम म्हणजे किती कोवळे आहे.

स्नेह म्हणजे प्रेम. तेल तूप याला सुद्धा स्नेह म्हणतात. म्हणजे चिकट असणे आणि अखंड प्रवाही असणे. हा गुण प्रेमात सुद्धा आहे. नाजूक, कोवळे पण कठीण आहे.

उदाहरण सांगतो म्हणजे याचा अर्थ अधिक स्पष्ट होईल.
महात्मा गांधी होते ना.
खरा वैरागी पुरुष यात शंका नाही.
त्यांचे राजकारण जाऊ दे.
पण खरा वैरागी पुरुष, सर्व सोडलेले असे.
त्यांना पुण्याला आगाखान पॅलेसमधे ठेवले होते.
तेव्हा तिथे बा आजारी पडल्या.बेशुद्ध होत्या. अधून मधून गांधी यायचे व बघायचे.
डॉक्टरांना विचारायचे कशी आहे प्रकॄती?

त्या गेल्यानंतर त्यांना चितेवर ठेवले अग्नी दिला आणि गांधींना एकदम रडायला आले, उसासाच आला.
कसे प्रेम असेल आतमध्ये? ज्या स्त्रीने आपल्याला एवढी वर्षे साथ दिली, आपल्याबरोबर कष्ट सोसले ती जाणार म्हटल्यावर त्यांनासुद्धा दुःख झाले. वैराग्यशील पुरुषाच्या अंगीसुद्धा कसे प्रेम आत असते.
लोकमान्यांना सहा वर्षे शिक्षा झाली आणि त्यांच्या पत्नीने खाणेच सोडले. त्या गेल्यानंतर लोकमान्यांनी आठवणीत लिहिले आहे. "मी हादरलो पण असली दुःखे माणसाने मुकाटपणे सोसली पाहिजेत".
हे लोक बाहेरून जरी कठोर असले तरी ज्यांच्याशी त्यांचा संबंध येतो त्यांच्यावर त्यांचे प्रेम असते यात शंकाच नाही.

तुकाराम महाराजांची पत्नी गेली ती दुष्काळात अन्न खायला नाही म्हणून गेली.
काय त्या पुरुषाला यातना झाल्या असतील.
ज्या पुरुषामध्ये भगवंतावर अलोट प्रेम करण्याचे सामर्थ्य होते त्यांचे पत्नीवर प्रेम नसेल का?
हे सर्व सांगण्याचा हेतू काय तर "तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा ".

No comments: